Thursday, 9 July 2015

मैत्री म्हणजे काय?

मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम


मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास

मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे

मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं

मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे

मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव

आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी

मनोमेघ

हा पाऊस आणि तुझी आठवण

हा पाऊस आणि तुझी आठवण
 दोन्ही आडवता येत नाही 
पण त्याना आडवायचं
 का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही.
~ चंद्रशेखर गोखले 

Tuesday, 7 July 2015

सरीवर सर ....

सरीवर सर ....

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

संदीप खरे

Thursday, 2 July 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Wednesday, 1 July 2015

पून्हा पावसाचे दिवस...

पून्हा पावसाचे दिवस अन पून्हा तुझं तसच
वागणं....
खिडकी लाऊन घेताना तिरप्या नजरेनं
बघणं ....
-चंद्रशेखर गोखले

| बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल |

" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||


" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "